समाजातील भ्रष्टाचार, अनागोंदी एकात्मिक ज्ञान सिध्दांताने संपणार पीपल्स हेल्पलाईनचा दावा
जनतेमध्ये एकात्मिक ज्ञान सिध्दांताच्या जागृतीसाठी पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- समाजातील भ्रष्टाचार, अनागोंदी एकात्मिक ज्ञान सिध्दांताने संपवू शकणार असल्याचा दावा करुन, पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जनतेमध्ये एकात्मिक ज्ञान सिध्दांताची जागृती करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.
भारतासह जगभरात भ्रष्टाचाराच्या आणि अनागोंदीच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना तात्पुरता पराभव स्वीकारावा लागला. त्याचा भ्रष्टाचाऱ्यांनी आपण कलियुगात वावरतो भ्रष्टाचार करणे आणि अनागोंदी वाढविणे याला कोणीही सजा करू शकत नाही, असा विचार सर्वत्र पसरविला आहे. त्यातून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झाला आणि सर्व सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले. महाराष्ट्रात सहकाराने गेली 50 वर्षे सर्वांना फायदे दिले. परंतु साखर कारखाने, पतसंस्थांचा पैसा खाजगी वापरासाठी भ्रष्टाचारातून घरी नेण्यात आला. त्यामुळे जनतेच्या संस्था मोडीत निघाल्या. शेतकरी आणि जनतेला कोट्यावधी रुपयांना बुडविले. पाप आणि पुण्य या संकल्पना कोणीही मानायला तयार नाहीत. त्यामुळे महसूल न्याय विक्री सर्रास सुरू आहे. सरकारी भ्रष्टाचार टोकाला गेला, मतं खरेदीकरुन सत्तापेढाऱ्यांनी सातत्याने सत्ता मिळवली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
परंतु या गोष्टी यापुढे चालणार नाहीत. कारण एकात्मिक ज्ञान सिद्धांत आणि परिवर्तन चक्र सिद्धांत यातून ही बाब सिद्ध झाली की, ऊर्जा, माहिती आणि चेतना यांच्या परस्पर संबंधातून प्रत्येक गोष्टीचे परिणाम निर्माण होतात. त्याचा परिणाम चांगले कार्य करणाऱ्याला समाधान करणारे यश मिळते. तर लबाड, ढोंगी आणि भ्रष्टाचारी यांच्या पुढील आयुष्यात यातना, दुःखाशिवाय काही एक शिल्लक राहत नाही. एकंदरीत कालपर्यंत कर्म सिद्धांत नैतिकतेवर आधारित होता. परंतु त्यामागे माहिती, चेतना आणि ऊर्जा यांच्या प्रक्रियेतून होणारे परिणाम कारणीभूत आहेत, ही बाबा आता विज्ञानाने सिद्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे कोर्ट कचेरीतच न्याय मिळेल असे नाही, तर समाजाला जाणीवपूर्वक दुबळे, करणाऱ्या ढोंगी आणि भ्रष्टाचारांच्या डोक्यात विज्ञान आणि निसर्ग प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही, ही बाब सर्वांना स्पष्ट रीतीने कळू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कालपर्यंत परमेश्वर म्हणून समजली जाणारी संज्ञा आता विश्वातील अभौतिक सर्वव्यापी चेतना आहे. आणि या चेतनाच्या कार्यपद्धतीतून निसर्गातील माणसासह कोणतीही बाब सुटू शकणार नाही. हे आता एकात्मिक ज्ञान सिद्धांताने विज्ञान, क्वांटम फिजिक्स, अध्यात्म, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, गणित या सर्वांचा एकच अभ्यास करून निसर्गातील कालपर्यंत गुप्त असलेली गोष्ट उघड्यावर आणली आहे. त्यामुळे समाजाचे, निसर्गाचे जाणीवपूर्वक शोषण करणाऱ्यांना दुःखाच्या खाईत निसर्ग आणि एकात्मिक सिद्धांतामागील विज्ञान नेल्याशिवाय राहणार नाही. सत्ता, संपत्ती आणि खोटी प्रतिष्ठा कोणालाही वाचवू शकणार नाही. सत्यमेव जयते, हीच भारताची घोषणा एकात्मिक ज्ञान सिध्दांताने सिद्ध केली असल्याचे म्हंटले आहे.