राजकारणात काका आणि पुतण्यांचा डीएनए सारखाचं!

राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए एकसारखाच असल्याचे आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत भुजबळ कुटुंबीयांना कुणी अडचणीत आणू पाहत असेल तर त्याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत नांदगावमधून समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. यावर छगन भुजबळ शुक्रवारी येवला येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, अशा अनेक पुतणे कंपनीने आपल्या काकांचे ऐकलेच आहे, असे वाटत नाही. राजकारणात या पुतणे कंपनीचा डीएनए वेगळाच आहे.