कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्याची मागणी

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने वेधले जिल्हाधिकारींचे लक्ष

 

अहमदनगर – पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर शहरासह जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराविरोधात   लक्ष वेधले. यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले आदी उपस्थित होते.

 

हे ही अवश्य पहा 

जिल्ह्यातील काही खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरचे कार्य अतिशय उत्कृष्टपणे सुरू आहे. परंतु काही कोविड सेंटर मध्ये सर्वसामान्य रुग्णांची पैशासाठी पिळवणूक होत आहे. रुग्णांकडून अवाजवी बिल आकारण्यात येत आहे. रुग्ण दाखल करण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात डिपॉझिट रकमेची मागणी केली जात आहे. हॉस्पिटल मध्ये नियमाप्रमाणे कुठल्याही प्रकारचे दरपत्रक फलक लावण्यात आलेले नाही. अनेक कोविड सेंटर शासकीय आदेशांची व नियमांचे उल्लंघन करुन मनमानी पध्दतीने वागत आहे. यासंदर्भात ऑडिओ, व्हिडिओ पुरावे देखील उपलब्ध आहेत. या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारे अधिकार्‍यांचे फोन सुद्धा लागत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर शासकीय नियमांचे पालन करण्याविषयी तात्काळ लेखी आदेश काढून दरपत्रकाचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे व खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटर वर नियंत्रण ठेवण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचा विचार न झाल्यास येत्या तीन दिवसानंतर आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.