घाई गडबडीत परवानगी घेणे शक्य झाले नाही,…

नऊ कोव्हीड हॉस्पिटलमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही

 

अहमदनगरमधील नऊ कोव्हीड रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्र उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोव्हीड रुग्णांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसतंय. राज्यभरातल्या कोरोनाच्या थैमानाने खासगी , सरकारी दवाखाने रुग्णांनी फुल्ल आहेत. त्याचप्रमाणे या संकट काळात कोव्हीड रुग्णालायाला आग लागून रुग्णांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. या पार्शवभूमीवर राज्य सरकारने तातडीने कोव्हीड रुग्णालयांचे फायर ऑडिट करायला सांगितले.

 

हे ही अवश्य पहा 

 

या आदेशाचे पालन करत अहमदनगर महापालिकेने नगरमधील कोव्हीड रुग्णालयांसहित इतर खासगी रुग्णालयांचे ही सर्वेक्षण करण्यासाठी खासगी संस्थांची  नेमणूक केली . या संस्थांच्या अहवालानुसार नगरमधील ४२ कोव्हीड रुग्णालयांपैकी ९ कोव्हीड रुग्णालयांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाची परवानगीच घेतली नसल्याचे समोर आलेय. कोव्हीड रुग्णावर उपाचार करणारी ही रुग्णालये आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत बेफिकीर असल्याचे समोर येतेय. या रुग्णालयांना तातडीने आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेने दिलेत.

कोरोना संकटकाळात कोव्हीड  रुग्णांना बेड्स कमी पडत असल्याने रुग्णालयावर थेट कारवाई न करता उपाययोजना करण्याबाबत सांगण्यात आले आहे. आग प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता किव्हीड सेंटर उभे राहिलेच कसे हा प्रश्न उपस्थित होतोय. घाईगडबडीत परवानगी घेणे झाले नाही, अशी सबब रुग्णालये पुढे करत आहेत. खासगी रुग्णालयातच कोव्हीड सेंटर सुरु केलेले आहेत. मग या रुग्णालयांना परवानगी कशाच्या आधारावर दिली गेली. आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत किंवा नाही, याची तपासणी केली कोणी यासह अनेक प्रश्न उपस्थित होतायेत.