मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी
मिरवणुकांमधील लेसर लाइट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. हा धोका लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सना बंदी घातली. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी केला असून, कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. १७ सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू असेल. विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे. बंदी आदेशानंतर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लेसर लाइट्सचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नेत्ररोगतज्ज्ञांनी केली होती लेसर लाइट्स बंदीची मागणी:
■ गणेश आगमन मिरवणुकीत अतितीव्रतेच्या लाइट्समुळे उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली. मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांना लेसर लाइट्सचा त्रास झाला.
■ याबाबत नियंत्रण कक्षाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.चेतन खारकांडे यांनीही लेसर लाइट्सवर बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती.