पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक

नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात- जिल्हाधिकारी देशमुख

पुणे,

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्या. निवडणुक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांच्याबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. मतदान आणि  मतमोजणी प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्या. मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करा. मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क,सॅनिटायझर आणि आवश्यक साहित्य पुरवा, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, निवडणूक कामकाजातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा. श्री. देशमुख म्हणाले, मतदान आणि  मतमोजणी कामासाठी योग्य नियोजन करा. निवडणूकीचे काम सुरळीत होण्याच्या दृष्टीने कायदा आणि  सुव्यवस्था, खर्च व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण आणि  वाहतूक आराखडा, निवडणूक साहित्य मागणी आणि  वितरण, मतदार यादी वितरण, टपाली मतपत्रिका, तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कामकाज, स्वीप कार्यक्रम, मतदारांना सोयी सुविधांची अंमलबजावणी, मतदार जनजागृती आदी विविध बाबींचा आढावा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला. निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपसात समन्वय साधून काम करावे, असे सांगून उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांचा आढावा घेतला. नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या जबाबदारी व केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.