पुणे १० घडामोडी 

पुणे ठळक घडामोडी: 

 १. 
इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय, चक्क बापानेच  स्वतःच्या मुलीचा नाक आणि तोंड दाबून खून केलाय. खुनाचे कारण समजताच सर्वांच्याच तळपायाची आग मस्तकात गेली. केवळ मुलगी आपली नसल्याचा संशय आल्याने बापानेच या चिमुरडीचा खून केला. इंदापूर पोलिसांनी नराधम बापाला अटक केली. 23 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. सकट्या म्हणजेच  शक्तिमान विकास काळे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई सोनम  काळे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. पिला  काळे  असे मयत चिमुरडीचे नाव आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
 २.
 
राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय,मात्र ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता परत आली आहे. मुंबईसह, पुण्यात थंढीचा कडाका वाढायला सुरुवात झालीय. गेल्या आठवड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे हवेतीला गारवा आणखी वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, आता शहरात किमान तापमानात हळूहळू घट व्हायला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या दोन दिवसांत थंडीचा पारा आणखी वाढेन असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
 
 ३. 
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुरवंडी गावात गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षाच्या बैलाला अज्ञात व्यक्तीने गळफास देऊन ठार मारले आहे. या प्रकरणी अज्ञातां विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलार जातीचे दीड वर्ष वयाचे वासरु विकत आणले होते. त्याला चांगला खुराक दिल्याने बैल चांगला तरबेज आणि रुबाबदार दिसत होता. या बैलाला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र संदिप तोत्रे यांनी बैलाची विक्री केली नाही.मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास बैलाच्या गोठ्यातील खांबाला रस्सीच्या सहाय्याने क्रुरपणे गळफास देऊन ठार मारले आहे. मात्र तोत्रे यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. 
 
 ४. 
 
‘सरल’ पोर्टलवर आता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी अर्ज भरतांना, जातीचा उल्लेख करण्यासाठी केवळ ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय शालेय शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नव्या पर्यायांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यायामध्ये तातडीने बदल करून चूक दुरुस्त करण्याची मागणी  परशुराम सेवा संघ आणि ब्रह्म महाशिखर परिषदेकडून करण्यात आली आहे. ‘शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ पोर्टलवर शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती अर्जाद्वारे भरण्यात येते. या  पोर्टलवर विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, वय, आधार क्रमांक, जात  हि सर्व  माहिती टाकली जाते. दोन नवे पर्याय असणाऱ्या रकान्यात यापूर्वी सर्व जातींचा उल्लेख होता. मात्र, गेल्या काही दिवसांत या रकान्यात बदल झाला असून, केवळ ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय दिसत आहेत. ही बाब अत्यंत  गंभीर आहे. यामुळे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वेगळे आहेत, असा चुकीचा संदेश समाजात जातोय. आधीच जातीयद्वेषाचा बळी ठरलेल्या ब्राह्मण समाजाला आता राज्य सरकारही सापत्न वागणूक देणार की काय,’ अशा भावना आमच्या मनात निर्माण झाल्याचे परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे यांनी म्हटले आहे.
५. 

पुणे जिल्ह्यात शिवसेना ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढणार

मा. खा. शिवाजीराव पाटील यांचे प्रतिपादन 
 
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे  माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलय. ग्रामपंचायत निवडणुका एकत्र लढवण्याचे आदेश नसून स्थानिक पातळीवरील राजकारण पाहून स्वतंत्र निवडणुक लढविण्याचे संकेत पक्ष श्रेष्ठीकडूनच देण्यात आले असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आढळराव पाटील म्हणाले, आघाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तसा आपल्याला कोणताही आदेश वरिष्ठाकडून नाही. मी जेव्हा नेत्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, तुमचं स्थानिक राजकारण पाहून तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटलं की,आघाडी करून फायदा होत असेल तर तुम्ही आघाडी करा. पण आपल्या तालुक्याचा विचार केला, तर तुम्हाला आमंत्रण द्यायला कोणी येणार नाही, असंही  ते यावेळी म्हणालेत .

 

 ६. 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या निविदा प्रक्रियेत होणारी अनियमितता आणि विकासकामांमध्ये झालेले आर्थिक घोटाळे व कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत चिंचवडे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलय . पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सर्व विभाग आणि स्मार्ट सिटीच्या कामातील निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. निविदा प्रक्रिया न राबविता विविध कामांना मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. नागरीकांच्या कररूपी पैशातून विकासकामे होत आहेत. पारदर्शक कारभार होण्यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्यावतीने वरील प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 ७. 

 

येत्या जानेवारी महिन्यात हद्दीलगतच्या 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावे घेण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील घोषणा 15 दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. गावांचा समावेश होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेनेही प्राथमिक तयारी दर्शविली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते. मात्र ही गावे महापालिकेत घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

८. 

 

भटक्या कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. या जखमी कुत्र्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणात प्राणी प्रेमी आणि खासदार मेनका गांधींनी आता लक्ष घातलंय. 12 डिसेंबरला पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत हा प्रकार घडला. एका अज्ञाताने सात महिन्यांच्या भटक्या कुत्र्याला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात जखमी झालेल्या कुत्र्याला उपस्थितांनी रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता. मग याप्रकरणी फरीनजहाँ शेख या महिलेने सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला. निष्पाप मुक्या प्राण्याचा असा गळा घोटल्याची बाब खासदार मेनका गांधींपर्यंत पोहचली. त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांना फोन करून अज्ञातास अटक करण्याच्या सूचना दिल्यात.

 

९. 

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरूवारी दिवसभरात ३६३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ०४४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५९ झाली आहे. पुण्याबाहेरील १ मृत्यूची नोंद करण्यात आली.

१०. 

वाहतुकीचे नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसांनी अनोख्या पद्धतिने  लाच स्वीकारली आहे, संबंधित कर्मचारी थेट खिशात  पैसे घेत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, यासंदर्भातला कसुरी अहवाल वरिष्ठांकडे सादर केलाय. त्यानंतर या महिला पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. स्वाती सोन्नर असं निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलिसांचे नाव आहे. सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत, पिंपरीतील साई चौकात दुचाकीवरून आलेल्या काही महिलांना त्यांनी थांबविले त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडिओ क्लिप तयार केलीय.