45 शाळातील 740 विद्यार्थ्यांची गैरसोय तुर्तास टळली
11 समूह शाळांचा प्रस्ताव थंड बस्त्यात
राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा निर्मितीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कमी पटाच्या शाळा बंद होऊन मध्यवर्ती ठिकाणी समूह शाळा विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 45 शाळांचे एकत्रीकरण करून त्या त्यातून 11 समूह शाळामध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. परंतु राज्य शासनाने ‘हा पायलट स्टडी होता,’ अशी भूमिका घेत विषय थंड बस्त्यात गुंडाळल्यामुळे 45 शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे 740 विद्यार्थ्यांची गैरसोय तुर्त टळली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांना समूह शाळा विकसित करण्यासाठी 21 सप्टेंबर 2023 रोजी निर्देश दिले होते. प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी गाव, वाडी-वस्तीपर्यंत शाळांची निर्मिती झाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नंदुरबार येथील तोरणमळ व पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबवण्यात आला. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कमी पटाच्या शाळांपैकी एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार 45 शाळांच्या एकत्रित करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठवले होते.