सत्ता तुमची , निर्णय तुम्ही घेणार आणि म्हणे, विरोधकांनो भूमिका घ्या

शरद पवार यांनी सत्ताधिकार्‍यांना फटकारले

पुणे : ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मत मांडाव’ असा भुजबळांचा आग्रह आहे. राज्यकर्तेही निर्णय द्यायचा अधिकार त्यांचा. सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती. शहाणपणाची तर अजिबात नव्हती. अशा शब्दात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ताधिकार्‍यांना फटकारले.
सत्ताधाऱ्यांच्या विधानांमुळे राज्यात वाद वाढला आहे. असा आरोप त्यांनी केला. पुणे येथील एका कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, ‘अलीकडील भुजबळांची दोन भाषणे छान झाली. त्याआधी ते बीडला गेले. बारामतीतही त्यांनी चांगलं भाषण केलं दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं त्यानंतर ते मला भेटायला आले भुजबळ मला म्हणाले, ‘झालं गेलं सोडून, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. पण स्पष्ट सांगायचं म्हणजे, या लोकांनी जी विधानं केली, ती वाद वाढवायला मदत करणार होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. या सर्व गोष्टीत सरकारतर्फे चर्चेला मुख्यमंत्री शिंदे होते, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार होते. इतरही होते. या लोकांनी काय निर्णय घेतला? मला माहित नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून त्यांनी परस्पर निर्णय घेतले. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे.’असेही पवार यांनी यावेळी सांगितले. मी सांगितले की, ‘प्रश्न सोडवायचा असेल तर काय कमिटमेंट केली आहे? कोणत्या गोष्टींची पूर्तता केली आणि करणार आहात? ते सांगा ओबीसींना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली असेल, तर तीही सांगा ती ही माहिती द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमचं धोरण दुरुस्त करून बाकीच्या गोष्टी विसरून, पुढे जाऊ असं मत पवार यांनी यावेळी मांडले.