सावित्री ज्योती महोत्सवांतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नगरकरांना लाभ घेण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 9 ते 12 जानेवारी दरम्यान सालाबाद प्रमाणे सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष किशोर डागवाले व डॉ. दिलीप जोंधळे यांनी दिली.
जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत युवक कल्याण योजनेमार्फत जय युवा अकॅडमी, समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उडान फाउंडेशन, रयत प्रतिष्ठान, प्रगती फाउंडेशन, जीवन आधार प्रतिष्ठान, अहिल्या फाउंडेशन, मुंबादेवी प्रतिष्ठान, समाज परिवर्तन संस्था आदींच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, संपूर्ण सुरक्षा केंद्र, बाळासाहेब देशपांडे रक्तपिढी, अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग, आनंद जनरल हॉस्पिटल, इंडो आयरिश हॉस्पिटल, काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज आदींच्या सहयोगातून भव्य रक्तदान शिबिर, रक्ताच्या विविध तपासण्या, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दंत तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, होमिओपॅथी उपचार, हाडांची तपासणी, हृदयरोग, मधुमेह, पाठदुखी, गुडघेदुखी, बालरोग, किडनी विकार, स्त्री आरोग्य तपासणी, आयुर्वेद उपचार पद्धतीवर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिबिरासाठी डॉ. भास्कर रणनवरे, डॉ. अनिल बोरगे, डॉ. कल्पना रणनवरे, डॉ. संजीव गडगे, डॉ. प्रमोद पालवे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धनाजी बनसोडे, डॉ. तस्लीमा पठाण, डॉ. सतीश लोंढे, डॉ. अनिता लोंढे, डॉ. सतीश राजुरकर आदी विविध वैद्यकीय तज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरासाठी जयश्री शिंदे, कांचन लद्दे, संतोष काळे, शिवाजी जाधव, अश्‍विनी वाघ, कावेरी कैदके, ॲड. पुष्पा जेजुरकर, आरती शिंदे, पोपट बनकर, बाबू काकडे आदी संस्थांचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. शिबिरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, प्रा. हर्षल आगळे, सुहासराव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.