विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे- डॉ.शिल्पा नरसाळे

सूच्चासिंगजी व सबलोक विद्यालयाचा पारितोषिक वितरण संपन्न

नगर- सध्या स्पर्धेचे युग आहे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. शैक्षणिक व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. त्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा असल्याने मुले तणावात असतात. त्याचा परिणाम आहारावर होऊन मग आरोग्य बिघडते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्य कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सकस आहार हवा फास्टफूड टाळा आरोग्य चांगले असेल तर बौद्धिक विकास होतो. असे प्रतिपादन डॉ.शिल्पा नरसाळे यांनी केले.
     अहिल्यानगर येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे 108 श्री महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालय व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालय यांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा नरसाळे, डॉ. अश्‍विनी भोईटे, मंडळाचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, खजिनदार दादासाहेब भोईटे, बाळकृष्ण सिद्दम, प्राचार्य रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, डॉ.सुचित्रा डावरे, सविता सानप, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, प्राचार्य भरत बिडवे, संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
     प्रमुख अतिथी डॉ.नरसाळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मोबाईल पासून दूर रहा. आरोग्य सुदृढ राहीले तर स्पर्धेत यशस्वी होताल.असे सांगितले.
       डॉ.अश्‍विनी भोईटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की पारितोषिक समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वोत्तम गुण हा सुप्त गुण असतो तो आत्मसात करून स्नेहसंमेलनात दिसायला पाहिजे. आपण जे बोलतो ते कसं घडत याचे प्रात्यक्षिक मुलांकडून प्रयोगाद्वारे डॉ.भोईटे यांनी करून घेतले सर्व विद्यार्थ्यांनी त्याला दाद दिली.
      यावेळी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मीरा नराल  माध्यमिक च्या मुख्याध्यापिका अंजली शिरसाठ यांनी आपापल्या विद्यालयात शैक्षणिक उपक्रम, विविध स्पर्धा, वार्षिक पारितोषिक मिळविलेल्या यश, विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती शैक्षणिक अहवालातून दिली. हस्तलिखितांचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
       अध्यक्षीय भाषणात मंडळाचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, खजिनदार दादासाहेब भोईटे यांनी आपल्या भाषणातून सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कामाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सर्वतोपरी सहकार्य करीत असते. संस्थेच्या सर्व विद्या लयात अद्यावत अशा सोयी सुविधा असल्याने विद्यार्थी देखील स्वतःच्या नावाबरोबर शाळेचे नाव विविध स्पर्धा परीक्षेतून अव्वल येऊन उंचावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया नवले यांनी केले तर चेतन कदम यांनी आभार मानले.