पारनेरच्या त्या नदीपात्रांचे वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप व्हावे

अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-

 

 

पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन अहवाल तयार करण्यात यावा व अहवालानुसार वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

 

 

अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांसह 1 एप्रिलपासून नदीपात्रात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला असून, जो पर्यंत वाळू उत्खननाचे मोजमाप करून अहवाल सादर केला जात नाही, तो पर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे म्हंटले आहे.

 

सबस्क्राइब करा 

 

पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. प्रशासनाच्या खाजगी महसूलसाठी या व्यवसायामुळे होणारा त्रास पारनेरच्या सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. गेली दीड वर्षापासून अवैध वाळू उपसाबाबत तक्रारी समितीच्या वतीने करून सुद्धा प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

 

 

 

तर अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांविरोधात आवाज उठविल्याने यापूर्वी हल्ले झाले असून, उपोषणस्थळी वाळू माफियांकडून हल्ला झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे रोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे. सदरील नदीपात्रत झालेल्या वाळू उत्खननच्या खड्डयांचे मोजमाप करून त्याचा अहवाल तयार करावा, अहवालानुसार अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.