“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!”
अहमदनगर येथील युवा अभिनेता हरिष देविदास बारस्कर यांची प्रमुख भूमिका असलेल्या “फिरस्त्या” या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधे पुरस्कारांचे अर्धशतक नुकतेच पूर्ण
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
अहमदनगर येथील युवा अभिनेता हरिष देविदास बारस्कर यांची प्रमुख भूमिका असलेल्या “फिरस्त्या” या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधे पुरस्कारांचे अर्धशतक नुकतेच पूर्ण झाले.
केरळ मधील कोची च्या “म्युझियम टॉकीज इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल, जुलै २०२१” मध्ये “फिरस्त्या” चित्रपटाला पुढीलप्रमाणे तीन पुरस्कार मिळालेले आहेत:
१) सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट : “फिरस्त्या”
२) सर्वोत्कृष्ट चित्रपट सह अभिनेत्री : अंजली जोगळेकर
३) सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीतकार : रोहित नागभिडे
“फिरस्त्या” या सिनेमाला केरळ मधे मिळालेला हा पहिला तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधील 57 वा पुरस्कार आहे. दिनांक 29 जुलै 2021 रोजी कोची, केरळमध्ये प्रीमियर स्क्रिनिंग देखील झाले आहे.
श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या “झुंजार मोशन पिक्चर्स” या निर्मिती संस्थे द्वारे झाली. फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन वर्षांपासून अथक मेहनत घेतली. या चित्रपटाचे शूटींग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले खुर्द या गावात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले. त्याबरोबरच पुणे, सातारा, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये देखील या चित्रपटाचे शुटिंग झाले आहे.
या चित्रपटात हरिष बारस्कर, समीर परांजपे, मयूरी कापडणे, अंजली जोगळेकर, बाल कलाकार – श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आज्ञेश मुडशिंगकर यांनी भूमिका केल्या आहेत. छायाचित्रण – गिरीष जांभळीकर, संकलन- प्रमोद कहार, पार्श्व गायक – आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत – रोहित नागभिडे, देवदत्त मनिषा बाजी,
गीत- गुरु ठाकूर, वैभव देशमुख, पार्श्व संगीत – रोहित नागभिडे, डी आय कलरिस्ट विनोद राजे यांनी केले आहे.
आपल्या धेया मागे धावणाऱ्या एका मुलाच्या बालपण, किशोरवय आणि तरुणपणी चा प्रवास, त्याच्या जीवनात काय-काय घटना घडतात ? यावर हा चित्रपट बेतला आहे. फिरस्त्या ही ग्रामीण भागातील एका मुलाच्या संघर्षाची कहाणी आहे. ही गोष्ट केवळ त्या मुलाच्या जीवनातील नसून फिरस्त्या सारखे जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. या चित्रपटात खरा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
प्रदर्शनापूर्वीच “फिरस्त्या” ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या 11 देशांमधील 24 इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये एकूण 53 पुरस्कार मिळवत पुरस्कारांचे ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे. या अगोदर “फिरस्त्या” हा चित्रपट पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) 2021 मध्ये सिलेक्ट झाला आहे ज्याचा अंतिम निर्णय येणे अजून बाकी आहे.
शिवाय “फिरस्त्या” चे भारत, अमेरिका, युनाइटेड किंग्डम, अर्जेन्टिना, स्पेन, स्वीडन, व्हेनेझुएला, लिथुआनिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो या 9 देशांतील एकूण 11 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये Official Selection झालेले आहे.