विक्रमी कामगिरीबाबत सिंधूला आनंद; देशासाठी पदक जिंकणे अभिमानाची गोष्ट

सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकवून दिल्याचा सिंधूला आनंद

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. शनिवारी झालेल्या सामन्यात चिनी तैपेईच्या ताई झू यिंगकडून पराभूत झाल्याने सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु, तिने हे अपयश मागे टाकत रविवारी चीनच्या हि बिंगजिओला सलग गेममध्ये पराभूत करत कांस्यपदक जिंकले. याआधी सिंधूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकवून दिल्याचा सिंधूला आनंद आहे.

 

 

डोक्यात खूप विचार सुरु होते

देशासाठी पदक जिंकणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असंख्य भारतीय चाहत्यांनी मला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. यापैकी प्रत्येकाची मी खूप आभारी आहे, असे सिंधू म्हणाली. मला पदक जिंकल्याने खूप आनंद झाला आहे. मी खूप वर्षे मेहनत घेतली असून हे त्याचेच फळ आहे. माझ्या डोक्यात खूप विचार सुरु होते. कांस्यपदक जिंकल्याने मी आनंदी असले पाहिजे की, अंतिम सामन्यात खेळण्याची संधी घालवल्याविषयी दुःखी? मात्र, मी चांगली कामगिरी केली आहे असे मला वाटते, असेही सिंधूने सांगितले.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

तसेच भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी ‘दोन’ वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूचे कौतुक केले. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन. तिने, तसेच तिच्यासोबत असलेल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या मेहनतीमुळे तिला हे यश मिळाले आहे. क्रीडा मंत्रालय, सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचेही तिच्या या यशात योगदान आहे. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असे गोपीचंद म्हणाले.