संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित पं. वसंत गाडगीळ यांचे निधन

संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित, तपस्वी, विद्वान, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ‘शारदा’ संस्कृत मासिकाचे संपादक पंडित वसंत अनंत गाडगीळ (क्य ९५) यांचे पुण्यात राहत्या घरी शुक्रवारी (ता. १८) पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. पंडित गाडगीळ यांच्यामागे मुलगा श्रीवर्धन, सून आणि नातू असा परिवार आहे.
पंडित गाडगीळ यांच्या पार्थिवाचे वैकुंठ स्मशानभूमीत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व शास्त्रज्ञ विजय भटकर, खासदार मेधा कुलकर्णी, एमआयटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड, संस्कृत भाषेचे अभ्यासक श्रीकांत बहुलकर, डॉ. सुरेश गरसोळे यांच्यासह सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले, त्यांच्या जाण्याने संस्कृत भाषेचे अतोनात नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्या.पंडित गाडगीळ यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३० रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात पुजारी होते. त्यांनी वैदिक, वेद, संस्कृतचे शिक्षण वेंगुर्ले आणि कोल्हापूर येथे घेतले. त्यांना गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग आणि इंग्रजांविरुद्ध लढत संस्कृतचे कार्य करत असल्याने कारागृहातही जावे लागले. कारागृहातूनच ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर पुण्यात येऊन त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान, १९५२ ते १९७२ या कालावधीत पुण्यातील दैनिक ‘सकाळ’मध्ये फोटोग्राफर आणि बातमीदार म्हणून सक्रियपणे काम केले.कुणीही व्यक्ती भेटल्यावर नमस्कार असे न म्हणता ‘नमो नमः’ असे संबोधन करण्याचा त्यांचा आग्रह असायचा. १९७२ नंतर काही काळ अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयात संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे संस्कृतच्या बातम्या आकाशवाणीमध्ये सुरू झाल्या. नंतरच्या काळात पुण्यातील पुणे विद्यार्थीगृह, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि डेक्कन कॉलेज, अशा अनेक संस्थांमध्ये संस्कृत आणि भाषाविषयक काम केले, अशी माहिती त्यांचे निकटवतीय वासुदेव डोंगरे यांनी दिली.