ज्येष्ठ नागरिकांसाठी, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ जाहीर

अहमदनगर : ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता यावे. यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने जाहीर केली आहे. यातून आवश्यक साधने घेण्यासाठी तीन हजारांचे अर्थसहाय्य केले जाते. यासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगण्यासाठी, वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य-साधने खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगाचार केंद्र त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते. त्यानुसार ज्येष्ठांना 3000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे कौटुंबिक, वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे. तसेच मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारद्वारे उपकरणे मोफत घेतलेली नसावी, त्याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, नंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर सहाय्य साधने खरेदी करण्यासाठी शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एक वेळ, एक रकमी तीन हजार रुपयांचा लाभ प्रदान करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधी लाभ घेतलेला नसल्याचे स्वयंघोषणापत्र आणि 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अशा या योजनेसाठी आपण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अहमदनगर या ठिकाणी योजनेचा अर्ज प्राप्त करू शकता.