अहमदनगर : गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरातील वाहतूक आज शनिवार सकाळपासून ते सोमवारपर्यंत बदलण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुक्रवारी काढला. शिर्डी या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, शिर्डी शहर नगर-मनमाड रोडवर येत असल्याने आजपासून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. अहमदनगर या ठिकाणहून मनमाडकडे जाणारी वाहने आरबीएल चौक, द्वारका सर्कल चौक, श्री साईनाथ हॉस्पिटल चौक, श्रीराम सर्कल चौक, झुलेलाल चौक, लक्ष्मी नगर टी पॉइंट मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच मनमाड कडून अहमदनगरकडे येणारी वाहने लक्ष्मी नगर चौक झुलेलाल चौक श्रीराम सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पिटल द्वारका सर्कल आरबीएल चौकमार्गे वळवण्यात येणार आहे. हा बदल शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब तसेच स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेली वाहने वगळून इतर सर्व वाहनांना लागू राहणार आहे. पुढील दोन दिवस शिर्डी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.