ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर : जिल्ह्यात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र जेष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यात चष्मा, श्रवणयंत्र, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, नंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे. या योजनेसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, जातीचे प्रमाणपत्र, वयाची 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक, घरातील उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी श्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबत लाभार्थी घोषणापत्र अशी आवश्यक कागदपत्रे आहेत. योजनेच्या अर्जासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावळे नाका येथे संपर्क साधावा असे देवढे यांनी यावेळी सांगितले.