अहिल्यानगरमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली, पण मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हिरव्या पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे काही महिने बाजारपेठेत हिरव्या भाजीपाल्या महागल्या होत्या. हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे दर आवाक्यात आले मात्र फळभाज्या अजूनही महागच आहेत. सध्या उपनगरांमध्ये शेवग्याचा दर प्रतिकिलो २०० रुपये, तर गावरान लसणाचे दर प्रतिकिलो ४०० रुपये आहे. अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच नालेगाव परिसरात मोठा भाजीबाजार भरतो. शिवाय चितळे रोड, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक, गणेश चौक, बालिकाश्रम रोड आदी ठिकाणी भाजीबाजार भरतो. या परिसरात फेरफटका मारुन बाजारभाव जाणून घेतले असता भाजीपाल्याची आवक आता वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्याने मागील महिन्याच्या तुलनेत भाजी बाजारात गवार, पालक, मेथी, कोथिंबीर जुडी, कांदा, हायब्रीड लसूण, टोमॅटोचे दर मागील १५ दिवसांच्या तुलनेत स्थिर दिसत आहेत. गवार १५ दिवसांपूर्वी १२० रुपये प्रतिकिलो होती, ती आता ४० रुपयांनी महागली असून, १६० रुपये प्रतिकिलो झाली आहे. शेवगा मात्र अद्यापही २०० रुपये किलो, तर गावरान लसूण तब्बल ४०० रुपये प्रतिकिलो, तर हायब्रीड लसूण १६० रुपये प्रतिकिलो आहे. पालेभाज्यांच्या जुड्यांचे दर १५ दिवसांपासून स्थिर आहेत. व्यापारी बाजारात भाजीपाल्यांची आवक सरासरी आहे. ऐन सणासुदीत हिरव्या पालेभाजांची आवक मंदावलेली होती. ती आता वाढली असल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, फळभाज्यांचे दर आवक कमी असल्याने चढेच आहे.
Prev Post
Next Post