पाथर्डीत तरुणीचा गळा आवळून खुन

नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी गीता रमेश राठोड हिचा गळा आवळून व लोखंडी रॉडने मारहाण करत खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्याची घटना तालुक्यातील डांगेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, गीता राठोड ही एका प्रेम प्रकरणात मुलीला मदत करीत असल्याचा संशय काही जणांना होता. सोमवारी गीता राठोड हिला मोटर सायकलवरून फिर्यादीच्या राहत्या घरात स्वप्निल राठोड यांचे नातेवाईक हरीश पवार यांच्या घरी डांगेवाडी येथे नेण्यात आले. तेथे गीताला आरोपींनी लोखंडी पाईपने व राॅडने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. साक्षीदार हे मध्ये पडले असता त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. यावेळी आरोपींनी गीता हिचा गळा आवळून खुन केला व मृतदेह विहिरीत टाकून दिला. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्वप्निल धोंडीराम राठोड, मनीषा सुरेश चव्हाण रा. साकेगाव ता. पाथर्डी, उषा बबन पवार रा. खाडके ता. जि.अहमदनगर, हरेश प्रभाकर पवार रा. डांगेवाडी, ता. पाथर्डी, किरण रामसिंग राठोड, अजय शंकर जाधव, निलेश रमेश राठोड रा. साकेगाव ता. पाथर्डी, बबन पवार, अभिषेक बबन पवार दोन्ही रा. खांडके ता. जि. अहमदनगर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीश प्रभाकर पवार व त्याच्या साथीदारांनी हा प्रकार घडवून आणला आहे. असे फिर्यादीचे म्हणणे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत. गीता हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह आणला होता. ‘खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी.’ अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर गीताच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रेम प्रकरण एकाचे आणि जीव मात्र दुसऱ्याचा गेल्याने हनुमान नगर येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.