वहिदा रहमान यांना फाळके पुरस्कार जाहीर

प्यासा, सीआयडी, गाईड, कागज के फूल, खामोशी आणि त्रिशूल यासारख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटांमधून सिनेरसिकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2021 सालचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. गाईड, सीआयडी, सोलवा साल, प्रेम पुजारी यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका बजावणारे बॉलिवूडचे चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असलेले देव आनंद यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या दिवशी वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांची निवड करणाऱ्या पुरस्कार निवड समितीमध्ये आशा पारेख, चिरंजीवी, परेश रावल, प्रसेजित चटर्जी आणि शेखर कपूर यांचा समावेश आहे. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केलं आहे.