सरकारी कर्मचारी संपावर ठाम
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून पुन्हा संपावर जाणार आहे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या बैठकीत करण्यात आला असून 26 नोव्हेंबरला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत पुढच्या टप्प्यातील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली.नवीन पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गवर आहे. गेल्या 17 वर्षापासून जुन्या पेन्शनचा लढा सुरू आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे यापूर्वीचा संप मागे घेण्यात आला, मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत काटकर बोलत होते.