आमदार लंके यांना थेट पिडीत कुटुंबीयांसह घेराव घालण्याचा इशारा

लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

रात्री-अपरात्री घरात घुसून नागरिकांना मारहाण करुन वेठीस धरणार्‍या पारनेर येथील तो पोलीस अधिकारी व त्याच्या साथीदारांवर कारवाई व्हावी व हा प्रकार त्वरीत थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या प्रकरणात लक्ष न घातल्यास सर्व पिडीत नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांसह थेट आमदार लंके यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे काही कर्मचारी पैश्यासाठी सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. बाबुर्डी (ता. पारनेर) येथील माजी सैनिक प्रशांत ठुबे यांना रात्री 1 वाजता घरी जाऊन पोलीसांनी घरच्यांसमोर मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर वनकुटे (ता. पारनेर) येथे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून तोंडाला रुमाल बांधलेले सात ते आठ पोलीस कर्मचारी भिल्ल समाजातील बबन बर्डे यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये घुसले. हरणाचे मटन मागू लागले व शिवीगाळ करुन कुटुंबीयांना त्यांनी मारहाण केली. तर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून  3 लाख रुपयांची मागणी केली.

सदर कुटुंबीयांनी भीतीपोटी 90 हजार रुपये देऊन आपली सुटका केली. तसेच पोखरी (ता. पारनेर) शमशुद्दीन शेख यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेल नसताना पोलीसांनी पहाटे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जावून घरातील महिला व लहान मुलांसमोर मारहाण केली. त्यांना समजपत्र देऊन सोडले. अशा अनेक प्रकरणामध्ये पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरुन सर्वसामान्यांना वेठीस धरले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.