पत्रकार वारिशे हत्या व पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांचा निषेध

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ले व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि.10 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. पत्रकारांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी केली.

प त्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यातील पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याच्या संदर्भात सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम.  देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशअध्यक्ष शरद पाबळे, राज्य सचीव मन्सूरभाई शेख, यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली शुक्रवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या अनुषंगाने शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले.

या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, लोकआवाज चे संपादक विठ्ठल लांडगे, विजयसिंह होलम, श्रीराम जोशी, बंडू पवार, महेश देशपांडे, आबिद दुल्हेखान, शिरीष कुलकर्णी, अन्सार सय्यद, नविद शेख, समिर शेख, उदय जोशी, संतोष आवारे, सुशील थोरात, साजिद शेख, यतिन कांबळे, शुभम पाचारणे, मुकुंद भट, वाजिद शेख, शब्बीर सय्यद, आबिद शेख, आफताब शेख, सुर्यकांत वरकड, रवी कदम, लैलेश बारगजे, लहू दळवी, परिषदेचे दक्षिण जिल्हा सचिव महादेव दळे आदी सहभागी झाले होते.

सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धाकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकार म्हणाले.