आरपीआयने कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना लावल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरू जवळ झालेल्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निषेध नोंदवून, अहमदनगर जिल्ह्यातून कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लाऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला.
केडगाव बाह्यवळण रस्ता येथे झालेल्या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, आयटी सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका संघटक महेंद्र मोहिते, युवक शहर उपाध्यक्ष सनी माघाडे, विक्रम चव्हाण आदी सहभागी झाले होते.
आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना निषेधार्ह असून, महापुरुषांची विटंबना करणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशा विटंबनेच्या घटनांमधून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांचा उद्देश असून, यामधील आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.