उमेदवार पाडल्याचा राग येऊन शहापूरच्या सरपंचाने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा केला बंद

शहापूरच्या सरपंचावर कारवाई होण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दोन उमेदवार पाडल्याचा राग येऊन नगर तालुक्यातील शहापूर येथील ग्रामस्थांचा मागील दहा महिन्यापासून पाणीपुरवठा सरपंचाने बंद केल्याचा आरोप करुन, सरपंचावर कारवाई करुन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणात दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, महिला जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्र घारु, ग्रामपंचायत सदस्या पूजाताई दारकुंडे, दिक्षा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नाना उबाळे, प्रविण जाधव, सनी खरारे, राहुल लखन, धीरज सारसर, अर्चना सत्रे, प्रदीप पवार, रफिक शेख, केशर दारकुंडे, ठकुबाई गाडेकर, भारती दारकुंडे आदींसह ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.


शहापूरचे सरपंच यांनी जाणून-बुजून गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सरपंचाकडे वेळोवेळी मागणी केली. उमेदवार पाडल्याचा राग मनात धरुन त्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.  सदरची बुर्‍हाणनगर पाणीयोजना आमदार शिवाजी कर्डिले यांनी 40 गावासाठी आणली. मात्र सरपंच जाणून बुजून गावकर्‍यांना त्रास देण्यासाठी वेठीस धरत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रार करुनही ग्रामस्थांना पाण्याबाबत न्याय मिळालेला नाही. पाण्यापासून ग्रामस्थांना वंचित ठेवण्याचे पाप सरपंच करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर गोरगरीब लोकांच्या घरकुलांचे प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयमध्ये धूळखात पडले असून, ते पंचायत समितीकडे मंजूरीसाठी देखील पाठविण्यात आलेले नाही. सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेऊन काम करत नसून, ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.


दहा महिन्यापासून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणार्‍या सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्याचे सरपंचपद रद्द करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, गावाला पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत ग्रामसभा घेऊ नये, ग्रामपंचायतमध्ये झालेल्या मागील दहा महिन्यातील सर्व कामाची तपासणी करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.