पालिकेला खड्डे बुजवताना पडला डांबर टाकण्याचा विसर.

नगरच्या खड्ड्यांचे नुसते खडीकरण.

ऋषिकेश राऊत
अहमदनगर प्रतिनिधी :-

 

नगर शहराच्या रस्त्याना एखाद्या जुनाट किल्ल्याला पाडावीत अशी भगदाड पडलेली आहेत. याबद्दल विविध माध्यमातून नगर महानगर पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर चौफेर टीका होत आहे. प्रत्येक जण आपल्या पोस्ट मधून पालिकेच्या गलथान कारभाराची चव काढत आहे. पण त्यातून पालिका काही बोध घेईल तर शपथ … पालिकेने गेला बाजार पाऊस थांबल्यानंतर कुना एका ठेकेदाराला खड्डे बुजविण्याचे काम दिले.

 

त्यावर या ठेकेदार महाशयांनी कडी केलीय . मध्यंतरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावेळी ज्या रस्त्यावरून ते जाणार होते ते खड्डे व्यवस्थित खडी आणि डांबर टाकून बुजविले . पण बाकीचे खड्डे बुजविताना तो डाम्बर टाकायचे बहुतेक विसरला असावा .

त्यामुळे तर शहरातल्या अंतर्गत रस्त्यावर फक्त खडी आणि वाळू टाकून खड्डे बुजविण्याची बोळवण केली जातीये . म्हणजे पुढचा पाऊस पडला की त्या पावसाच्या पाण्यात ही खडी पुन्हा वाहून जाईल वाळूचा चिखल होईल आणि आपली पालिका पुन्हा शहारत झालेले खड्डे बुजविण्याचे टेंडर काढेल . नगरच्या लाल टाकी रस्त्याची ही परिस्थिती आहे. वास्तविक सिव्हिल हॉस्पिटल ते लाल टाकी या रस्त्यावर खड्डे बुजविताना पालिकेचे अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

पण बहुतेक एकदोन खड्डे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या देख रेखीखाली व्यवस्थित बुजविण्यात आले पण नंतर पुढे अधिकारी निघून गेल्यावर कदाचित ठेकेदाराने रस्ता बुजविणाऱ्या कामगारांना डोळा मारला असावा आणि खडी वर डाम्बर टाकण्याबाबत कर्मचाऱ्यांना विस्मृती झाली असावी .