चिचोंडी पाटीलच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा वारकरी परिषदेच्या वतीने सत्कार

     अखिल विश्‍व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनमतामधून निवडून आलेले सरपंच शरद (भाऊ) पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी नुतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, अण्णा कोकाटे, चंद्रकांत पवार, अमोल खडके, जितू गाडे, कल्याण जगताप, राम जगताप, ज्ञानेश्‍वर ठोंबरे, गंगाधर दरेकर, नामदेव थोरवे, शंकर कोकाटे, तुकाराम कोकाटे, भोस गुरुजी, करांडे गुरुजी आदी उपस्थित होते.

जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग म्हणाले की, पंचायतराज पद्धतीमध्ये जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाकडून ग्रामस्थांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पूर्वी घोडेबाजार होऊन सदस्यांमधून निवडून आलेल्या सरपंचाकडून भ्रमनिरास व्हायचं. जनतेने निवडलेला सरपंच गावाला विकासाची दिशा देणार आहे. गावाच्या विकासासाठी निवडणुकीनंतर राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

ग्रामस्थांचे प्रश्‍न केंद्रबिंदू मानून योगदान दिल्यास गावाची विकासाकडे वाटचाल होण्यास मदत होईल . तर काळाची गरज ओळखून पर्यावरण व जलसंधारणाच्या दृष्टीकोनाने कामे करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरपंच शरद पवार यांनी सत्काराला उत्तर देताना चिचोंडी पाटील गावाच्या विकासासाठी कटिबध्द राहणार आहे. सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जनतेने टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.