सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

जिल्हा मराठा विद्या प्रसारक चे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांना जाहीर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा “जीवनसाधना” गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ‘नंदकुमार झावरे’ यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नंदकुमार झावरे यांचा योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार साठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे

दरवर्षी 10 फेब्रुवारीला विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण केले जाते.
ज्येष्ठ काँग्रेस नेते पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात झावरे यांनी काम केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात त्यांनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून तेथील शेतकरी, कष्टकरी -कामगार यांचे जीवनमान उंचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी१९८५ ते १९९५ असे सलग दहा वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी पारनेर महाविद्यालयामध्ये अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, तसेच तालुक्यामध्ये माध्यमिक शाळा, नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आश्रम शाळा, प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालयांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम सुरु करण्यामध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान  आहे .
ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी निघोज , देवळाली प्रवरा, रुईछत्तीसी येथे संस्थेच्या माध्यमातून वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. संस्थेच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील आणि परदेशातील अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांशी आणि शिक्षण तज्ञांबरोबर सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्हा मराठा शिक्षण संस्था जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम करत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील , पद्मभूषण अण्णा हजारे, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा मराठा चे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जीडी खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, संस्थेचे सर्व विश्वस्त, कार्यकारी मंडळ सदस्य आणि संस्था सेवकांनी नंदकुमार झावरे यांचे अभिनंदन केले आहे.