मंत्री विखे पाटील यांचा पारनेर मध्ये भेटीचा धडाका!

समाजसेवक आण्णासाहेब हजारे,विजय औटीची घेतली भेट

गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यात भेटीगाठीचा धडाका लावला.जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

दोन दिवसांपुर्वी महायुतीचे उमेदवार खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांना आलेली धमकी आणि या घटनेचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद पाहाता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेला पारनेर दौरा लक्षवेधी ठरला आहे.

या दौर्यात जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांची राळेगण येथे भेट घेवून मंत्री विखे पाटील यांनी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.या दोघा मध्ये सुमारे अर्धातास बंददारा आड चर्चा झाली.मात्र या चर्चाचा तपशिल समजू शकला नाही.

महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्याचा संवाद समाज माध्यमामध्ये प्रसारीत झाल्या नंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले.प्रसारीत झालेला संवाद आणि त्यातील व्यक्ति विरोधी उमेदवारांचे समर्थक असल्याची चर्चाही सुरू झाली.याविरोधात महायुतीच्या वतीने पुरावे सादर करून संबंधित व्यक्ति विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

या घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांचा पारनेरचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.या दौर्यात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून प्रचाराचा कानमंत्र सुध्दा दिला आहे.आगामी काळात तालुक्यातील प्रचाराचे नियोजन तसेच मतदारपर्यत पोहोचण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.

विशेष म्हणजे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांची निवासस्थानी जावून मंत्री विखे पाटील यांनीभेट घेतली.एक तासाच्या भेटीला विशेष महत्व आले आहे.