महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव

दैनंदिन स्वच्छतेसाठी करत असलेल्या कामाची दखल;

महापालिकेतील स्वच्छता  कर्मचारी हे शहर  स्वच्छ  ठेवण्यासोबतच नागरिकांचे आरोग्य देखील जपत असतात. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. काही तासासाठी स्वच्छता अभियान राबवून काही व्यक्ती प्रसिध्दी मिळवतात. मात्र हे स्वच्छता कर्मचारी सातत्याने शहर स्वच्छतेसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी योगदान देत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला .

बालिकाश्रम रोड, लेंडकर मळा परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखील वारे, अ‍ॅड. धनंजय जाधव, किशोर डागवाले, ज्ञानेश्‍वर काळे, महेश लोंढे, आकाश सोनवणे, भैय्या लेंडकर, अमोल शिंदे, त्रिदल सेवा संघाचे प्रवक्ते आठरे मेजर, राजेशाही उद्योग समूहाचे उजेफ सय्यद, साई अकॅडमीचे संचालक प्रा. जायभाये, प्रा. पिंपळे आदींसह लेंडकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दैनंदिन स्वच्छतेसाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन मिळालेल्या मान-सन्मानाने स्वच्छता कर्मचारी भारावले.