लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध

लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे विश्‍वस्त वसंतराव कापरे व मीरा पाटील्स टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मानसिंग पाटील, तारांगण प्री-प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष जगदीश देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारभाऊ वाकळे, नगरसेवक मदन आढाव, कमल सप्रे, रीताताई भाकरे, अशोक बडे, शिवसेना नेते लोभाशेट कातोरे, संस्थेचे चेअरमन अर्जुन खिळे, सचिव मोहिनी खिळे, खजिनदार अजित काकडे, विश्‍वस्त सविता खिळे, डॉ. देविदास खिळे आदींसह शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. लहान लहान मुलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले. शैक्षणिक वर्ष 2022-23  मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड ‘आरोही मेटे’ हिला देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कुलकर्णी यांनी केले. आभार पुनम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित ताकपेरे व सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.