सरगमचे अध्यक्ष राम शिंदे यांना “पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार” प्रदान

 भारतीय अभिजात संगीताचा प्रचार आणि प्रसार यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून देत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल नगरमधील सरगमप्रेमी मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य व सांप्रत अध्यक्ष  राम शिंदे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा “पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार” नवी मुंबई च्या वाशी येथे १९ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला‌. अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ.देवेंद्रजी कुलकर्णी, सचिव श्री.सुधाकरजी चव्हाण, सर्वश्री जामिनीकांत मिश्र, डॉ.किशोर देशमुख, संयोजक प्रा.रामराव नायक, सर्व मंडळ प्रबंध परिषद सदस्य आणि मंडळाचे रजिस्ट्रार श्री.विश्वास जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ.पुरु दाधीच, नवी मुंबई आयुक्त श्री.राजेशजी नार्वेकर आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
     पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी अमूल्य असे योगदान दिलेले आहे. त्यांची १५० वी जयंती दि.१८ ऑगस्ट रोजी व पुढे तीन दिवस उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंडितजींच्या या कार्यासाठी भारतभरातून ज्या संगीतज्ञ, कलाकार, संगीत शिक्षक आणि संगीत प्रचारप्रसारकांनी परिश्रम घेतलेले आहेत अशा देश  पातळीवरील १५१ विभुतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये नगरमधून राम शिंदे यांची निवड करण्यात आलेली होती.
     याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. शिंदे यांच्या रूपाने नगर ला पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे.