सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये “ऑल ब्रदर्स” संघाचा विजय

स्पर्धेत शहरातील फुटबॉल संघांचा उत्स्फूर्त सहभाग

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग २०२३ सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम अटातटीच्या सामन्यात पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने १-० गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर विजय मिळवून सिटी क्लब चॅम्पियनशिपचा चषक पटकाविला. शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.

या स्पर्धेत शहरातील फुटबॉल संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल तीन दिवस फुटबॉल स्पर्धेचा थरार प्रेक्षक व फुटबॉल प्रेमींनी अनुभवला. ऑल ब्रदर्स संघ व युनायटेड सिटी हॉस्पिटल संघाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी १-१ गोल करुन बरोबरीत राहिले. शेवटच्या क्षणी पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने १-०  गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर दणदणीत विजय मिळवला. तर युनायटेड सिटी हॉस्पिटल रनरअप संघ ठरला. तर तृतीय क्रमांक लेंडकर एफसीने मिळवले.

प्रथम विजेत्या संघास २१  हजार रोख चॅम्पियनशिप चषक, द्वितीय संघास ११  हजार रोख चषक आणि  तृतीय संघास ७  हजार रोख चषक तर इतर उत्कृष्ट खेळाडूंना सायकल आणि रोख बक्षिसं देण्यात आली. प्रथम बक्षिसाचे प्रायोजक गजेंद्र भांडवलकर, द्वितीय बक्षिसाचे झिशान शेख तर तृतीय बक्षिसाचे शशांक कर्णिक होते.

आमदार संग्राम जगताप, उद्योजक पै. अफजल शेख व गजेंद्र भांडवलकर यांनी विजेत्या संघास व स्पर्धेत यश प्राप्त करणार्‍या उत्कृष्ट खेळाडूस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आयोजक गणेश गायकवाड यांनी फुटबॉल खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.