15 डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्यात सात एचआयव्ही बाधित जोडपी बांधणार लग्नगाठ

विवाहासाठी 400 वर एचआयव्ही बाधितांची नोंदणी; स्नेहाधार तर्फे बाधितांना मार्गदर्शन

जागतिक एचआयव्ही सप्ताह निमित्त स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पातर्फे आयोजित सहजीवनाची ओढ असणाऱ्या एचआयव्ही संसर्गितांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त एचआयव्ही संसर्गितांनी नाव नोंदणी केली एचआयव्ही संसर्गित व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय होती. राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यात निवड झालेल्या सात जोडीदारांचा सामुदायिक विवाह सोहळा 15 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याची माहिती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख विद्या घोरपडे यांनी दिली. प्रशांत येंडे यांनी महाराष्ट्रातील एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या सद्यस्थितीबाबत माहिती देऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना कोणत्याही शासकीय योजनांसाठी मदत हवी, असल्यास त्वरित बालकल्याण समितीकडे संपर्क साधण्याचे विनंती यावेळी केली गेली.