मुसळगाव येथे भेसळ युक्त 314 किलो पनीर सापडले

नाशिक जिल्ह्यातील कारखान्यावर एफडीएचा छापा

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव येथील यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 314 किलो भेसळयुक्त पनीर घटनास्थळीस नष्ट करण्याची कारवाई अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. यावेळी भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केले. अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने दोघांनी भागीदारीत भाडेतत्त्वावर पनीर बनवण्याचा उद्योग सहा महिन्यांपूर्वीचा सुरू केला होता. औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक 82 मध्ये असलेल्या या कारखान्यातील संयुक्त पदार्थांचे नमुने अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी तपासणीसाठी घेतले असून, ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रलंबित असून तो आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल. भेसळयुक्त पनीर नाशवंत असल्याने व मानवी सेवनास हानिकारक असल्याने अधिकाऱ्यांनी ते जागेवरच नष्ट केले. भेसळ करणारे संशयित, न्यायालय दोषी सिद्ध झाले तर त्यांना सहा महिने ते एक वर्षापर्यंत दंडासह शिक्षा होऊ शकते. तसेच भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांना जन्मठेपही होऊ शकते. असे नाशिकचे अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर म्हणाले.
ग्राहकांनी सुद्धा कमी पैशांमध्ये अनेक खाद्यपदार्थ मिळतात म्हणून त्यांच्याकडे ओढा असण्यापेक्षा त्यांची क्वालिटी चेक करून नंतरच अन्नपदार्थांचे सेवन करावे असेही सांगण्यात येत आहे.