शिर्डी भाविकांसाठी आनंददायी योजनांची आखणी
भक्तांना गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साई संस्थानकडून यंदा खास निमंत्रण
शिर्डी : दीर्घ प्रतीक्षेनंतर साई संस्थानमध्ये भाविकांसाठी चांगले दिवस आलेले आहे. भक्तांचे साईदर्शन आणि त्या ठिकाणी वास्तव्य आनंददायी आणि संस्मरणीय होईल. यासाठी अनेक उपाययोजनाची आखणी करण्यात आली आहे. साई संस्थांनचे सभासद आणि देणगीदार भक्तांना गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साई संस्थानाकडून यंदा खास निमंत्रण देण्यात आले. त्यांचे दर्शन उत्तम व्हावे आणि त्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मंदिर परिसर, दर्शन रांग, रुग्णालय, भक्तनिवास या ठिकाणी वारंवार भेट देऊन आणि सामान्य भाविकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणींना तत्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देणगीदार भाविकांचा आवर्जून सन्मान करण्यात येत आहे. त्यांच्या अडचणी, सूचना आणि त्यांचे अनुभव यावर पदस्थ मंडळी विशेष भर देत आहेत. मंदिर परिसरात लाडू प्रसाद काउंटर सुरू करण्यात आले असून साई संस्थांनच्या वेगवेगळ्या विभागांची माहिती देणारी डॉक्युमेंटरी करण्याचे काम सध्या सुरू आहे. मंदिर परिसरातल्या ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये विधिवत पूजा सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागांचे लहान-मोठे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे. तसेच सर्व धर्माच्या धर्मग्रंथांची लायब्ररी करणे, येणाऱ्या भाविकाला केवळ दर्शन न घडवता, त्याला साईबाबा व संस्थानविषयीची माहिती देणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, वेगळा गणवेश देणे बाबींवरही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती संबंधित सूत्रांकडून हाती आली आहे. या सर्व भावी सुविधांमुळे अर्थातच शिर्डी भक्तांसाठी अनेक आनंदाच्या घडामोडी या निमित्ताने घडणार आहेत.