राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

सहभागी होण्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

अहमदनगर : आपापसातील वाद तडजोडीने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे येत्या शनिवारी म्हणजे सत्तावीस जुलै रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज, वितरण कंपनीची प्रकरण, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउंसची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीची दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहे. याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाची प्रकरणे, लोकन्यायालयामध्ये तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. ज्या नागरिकांना आपले प्रकरण लोकन्यायालयात ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहमदनगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधिसेवा समिती येथे संपर्क साधावा. आपली प्रकरणे लोक न्यायालयात ठेवायची असल्यास संपर्क क्रमांक 85919036 16 ज्या क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल आय डीवर आपण संपर्क करू शकता. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. याशिवाय लोकन्यायालयामध्ये प्रकरण मिटवल्यास कोर्ट फी परत मिळते. लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने मिटवल्याने वेळेचा व पैशांचा अपव्य टाळला जातो. लोकन्यायालयात प्रकरण तडजोडीने मिटवल्यास त्यावर वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील करता येत नाही. त्यामुळे दोन पक्षकारांमधील वादाला पूर्णविराम मिळतो.