नगरला उभारणार बिबट्यांचे रेस्क्यू सेंटर

आराखडा तयार करण्याचे नगर विभागाला, शासनाचे आदेश

अहमदनगर : नगरमध्ये काही दिवसांपासून केडगाव, पारनेरसारख्या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सर्रासपणे दिसून येत आहे. या पायी अनेक जनावरे, माणसांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रामुख्याने बिबट्याचा वावर जास्त दिसून येतो, त्या ठिकाणी बिबट्यांचे रेस्क्यू सेंटर असणे नितांत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्नर आणि नागपूरमध्ये जसे बिबट्यांचे रेस्क्यू सेंटर आहे. त्याच पद्धतीचे रेस्क्यू सेंटर आता अहमदनगरमध्ये निर्माण व्हावे. यासाठी शासनाने आराखडा तयार करण्याचे निर्देश अहमदनगर विभागाला दिलेले आहे. त्याच्यात जुन्नर या ठिकाणी माणिकडोह तसेच नागपूरला गोरवाडा या ठिकाणी या प्रकारचे रेस्क्यू सेंटर आहे. या सेंटरमध्येही क्षमतेपेक्षा जास्त बिबट असल्याने राज्यस्तरावर नाशिकसह अहमदनगरला असे सेंटर उभारण्यात येणार आहे. याबरोबर जुन्नरची क्षमता वाढ होऊ शकते. उपवनसंरक्षक सुवर्ण माने यांच्या कार्यालयात अहमदनगर सेंटरसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या रेस्क्यू सेंटरमध्ये जे बिबट अथवा वन्यजीव दिव्यांग झाले असतील किंवा शिकार करण्यास सक्षम नसतील अशा वन्य जीवसाठी निवाऱ्याची व्यवस्था केलेली असेल. कारण अनेकवेळा जेरबंद बिबट्याला सोडण्याची परवानगी मिळेपर्यंत असे बिबट संभाळावे लागतात. त्यानुसार नगरला किमान 30 बिबट ठेवता येतील. अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. कारण वर्षभरात पाच जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. 3381 पाळीव प्राणी या बिबट्यांनी फस्त केले. जिल्ह्यात पाच वर्षात 191 बिबट्यांचा विहिरीत पडून तसेच अपघातात मृत्यू झाला. दोन वर्षात फक्त 13 बिबटे जेरबंद करण्यात आले. या सगळ्या गोष्टींचा विचार करता रेस्क्यू सेंटर उभारण्याची गरज प्रामुख्याने समोर आलेली आहे.