लाडकी बहीणसाठी पोस्टात सत्तावीस दिवसात 55 हजार 943 खाती
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राज्य सरकारने जूनमध्ये पावसाळी अधिवेशनात जाहीर केली. ही योजना 1 जुलैपासून प्रत्यक्ष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थी बहिणीला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. ते उघडण्यासाठी बँकेत मान्यताप्राप्त असलेल्या ऑनलाईन सेंटर आणि टपाल कार्यालयात महिलांची गर्दी सध्या होताना दिसते. 1 ते 27 जुलै या 27 दिवसात जिल्ह्यातील पोस्ट बँकेत 55 हजार 943 महिलांनी खाते उघडले आहेत. हे खाते उघडण्यासाठी अडीचशे रुपये खर्च येत आहे. टपाल खात्याच्या माध्यमातून एक कोटी 39 लाख 85 हजार रुपयांची उलटण झाली आहे. 1500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याने बँक खाते उघडण्यासाठी महिलांचे धडपड सध्या सुरू आहे. सर्वात कमी शुल्क पोस्ट बँकेत लागत असल्याने पोस्ट बँकेचे खाते उघडण्याला लाडक्या बहिणी प्राधान्य देत आहेत. केडगाव टपाल कार्यालयातील पोस्टमन इतर कामांसह हे खाते उघडण्याचे कामही सध्या करत आहे. शासकीय बँकेत खाते उघडण्यासाठी होणारी गर्दी आणि किचकट अटी यामुळे बहुतांश महिला खाते उघडण्यासाठी टपाल कार्यालयाला प्राधान्य देत आहे. रोखीने पैसे ठेवणे व काढणे यावर इथे मर्यादा नाही. बिल पेमेंट व रिचार्ज व्यवहार मोफत त्याबरोबरच पैसे ठेवणे आणि काढण्याची घरपोच सेवा मोफत असल्याने या ठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाते उघडण्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता नसल्याने महिलांना खाते उघडणे या ठिकाणी सोयीचे आहे. त्यामुळे महिलांची गर्दी होत आहे. सर्व पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक यांना तत्पर सेवा देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. काही गावांमध्ये मिळावे घेऊनही पोस्टात खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.