फायर ऑडिटच्या गोंधळानंतर, अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलची दिव्यांग प्रमाणपत्र यंत्रणा हॅक
शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांचा दावा
अहमदनगर : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाल्याच चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. यामध्ये अहमदनगरचे जिल्हा रुग्णालय या घोटाळ्यात राज्यात आघाडीवर असण्याची शक्यता आहे. या रुग्णालयाच्या नावाने बनावट ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान झालेली असतानाही रुग्णालय प्रशासन गुन्हा दाखल करण्यास सध्या टाळाटाळ करताना दिसतय. आरोग्य प्रशासनातच या घोटाळ्याचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगर जिल्हा रुग्णालयाने तपासणी केली नसतानाही तीन व्यक्तींना एप्रिल 2024 मध्ये शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित झाले. यातील एकही व्यक्ती सदर तारखांना जिल्हा रुग्णालयात तपासणीला आल्याची नोंद रुग्णालयात नाही. रुग्णालयाने तपासणी केल्याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग व्यक्तीला याची ओळख दर्शवणारा क्रमांक मिळू शकत नाही. अशी यंत्रणा कार्यान्वित असतानाही तीन व्यक्तींना मात्र हा क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळाले. सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केल्यामुळे ही बाब उघड झाली आहे. या तीन व्यक्तींना मिळालेले प्रमाणपत्र बोगस आहे. हे जिल्हा रुग्णालय मान्य करते. याशिवाय या तीनही प्रमाणपत्रांवर नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह वैद्यकीय बोर्डाच्या स्वाक्षऱ्याही आहेत. प्रशासनाच्या सांगण्यानुसार रुग्णांची माहिती संकेतस्थळावर जिल्हा रुग्णालयात अपलोड करत असते. त्यानंतरच सदर रुग्णाला
युडीआयडी क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे या तीनही व्यक्तींची माहिती जिल्हा रुग्णालयातूनच अपलोड झाली असण्याची शक्यता आहे. मात्र ती कोणी केली? याचा गोप्यस्फोट मात्र जिल्हा रुग्णालयाने आजवर केलेला नाही. मात्र जिल्हा रुग्णालयाने हा गुन्हा दाखल मात्र केलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील सर्वांची कसून चौकशी व्हावी. अशी अपेक्षा रुग्णांकडून व्यक्त केली जात आहे.