नदीकाठच्या गावांना इशारा

राज्यात अतिवृष्टीचा अंदाज, धरणातूनही विसर्ग सुरू

अहमदनगर, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू असून पर्जन्यमानामुळे दौंड पूल येथे भीमा नदीच्या निसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदी काठावरील नागरिकांना अतिशय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदूर, मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विदर्गमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील, गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान सुरू असून धरण क्षेत्रात संताधार पाऊस अथवा अतिवृष्टी झाल्यास नदीतील निसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे अकोले तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांनाही जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे, नाले यापासून दूर राहावे, आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची शक्यता व दर्डी कोसळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदीच्या प्रवाहमध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्र. 1077 हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय 0241 – 2323844 किंवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी केले आहे.