केडगावमधील रस्ता खड्डेमय : चालणे देखील कठीण
केडगाव, भूषणनगरमधील लिंकरोड दरम्यान रस्त्यांचा प्रश्न ,
केडगाव : केडगावमधील रस्ता खड्डेमय झालेला आहे. यावरून चालणेदेखील मुश्किल झाले आहे. रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्यास रस्त्यावरील चिखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा केडगावमधील नागरिकांनी दिला आहे. केडगाव, भूषणनगरमधील लिंकरोड यादरम्यान रस्त्यांचा प्रश्न मंजूर असूनही मार्गी लागत नाही. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नगरपरिषदेने त्या संदर्भात निविदाही काढल्या. तरीही या कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांनी धडक मोर्चा काढला होता. नागरिकांना घरातून बाहेर पडणे ही अवघड झाले असून, चार ते पाच अपघात या ठिकाणी झाले आहे. सुदैवाने त्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये कोणाचा जीव गेलेला नाही. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे जर गंभीर अपघात झाला. तर त्याला नगरपालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे.नागरिकांनी दिलेल्या निवेदनात गेल्या १२ वर्षात केडगावकरांना पक्का रस्ता मिळाला नाही, दरवर्षी पावसाळ्यात ड्रेनेज लाइन,पाण्याची लाइन आणि रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याचा होणारा त्रास अशा अनेक समस्यांचा लेखाजोखा मांडला आहे. या वेळी नागरिकासोबत आदित्य बल्लाळ जयेश कोके, संग्राम जगताप, श्रीकांत निंबाळकर मनोज पारखे आदी उपस्थित होते.