शिर्डीमध्ये साईसच्चरित पारायणास जवळपास ७००० भक्तांची हजेरी

श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते १२ ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यात ६ हजार ५०० पेक्षा अधिक पारायणार्थीनी सहभाग घेतला होता. सोमवारी सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्रीसाईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व फोटोची, हनुमान मंदिर व द्वारकामाई मार्गे साई आश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत वाद्यांसमवेत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी श्रींची प्रतिमा व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला होता.

यावेळी प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करून श्रीसाईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी ७ ते ११.३० पुरुष वाचक व दुपारी १ ते ५.३० महिला वाचक यांच्या यावेळेत श्रीसाईसच्चरिताचे वाचन करण्यात आले. तसेच अनहद ग्रूप (नाशिक) यांचा संगीतमय भक्तीसंगीत कार्यक्रम, ज्ञानदेव आबा गोंदकर यांचा ‘समाधीनंतर श्री साईबाबांचे साक्षात्कार’ या विषयावर प्रवचन आणि सुजाता कदम चाळाखेकर (नांदेड) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गेट क्रमांक ३ समोरील श्रीसाईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात होणार आहे.