महानुभावच्या अभ्यासासाठी ज्ञानपीठ

जेऊर कुंभारी येथे श्रीकृष्ण मंदिराची उभारणी

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक मानले जातात. यांनी अनेक ग्रंथ लिहिले, या पंथाचा व त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे भव्य ज्ञानपीठ उभारले जात आहे. या ज्ञानपीठातून शेकडो विद्यार्थी घडतील असा विश्वास ज्ञानपीठाचे प्रमुख डॉ. यशराज महाराज यांनी व्यक्त केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नगर, मनमाड महामार्गावर असलेले श्रीकृष्ण मंदिर व ज्ञानपीठ बाधित झाले होते. त्याचा मोबदलाही मिळाला. मिळालेला मोबदला या कामीच खर्च करायचा ध्यास डॉ. यशराज महाराज यांनी घेतला आणि जेऊर कुंभारी परिसरात कोपरगाव- संगमनेर रस्त्यालगत त्यांनी दोन एकर जागा खरेदी केली, संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत उभारली आहे. या ज्ञानपीठात सध्या ३० मुली, दोन मुले, दोन साधू आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था,पंथाचे प्रचारक अनुयायांची राहण्याची व्यवस्था, दीड किलोमीटर येथे विहीर घेऊन पाइपलाइन करत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खानपानाच्या व्यवस्थेसाठी स्वयंपाक घर आदी व्यवस्था पूर्णत्वास गेल्या आहेत. १२० नारळाची झाडे व इतर फळांची झाडे येथे लावण्यात आली आहेत. ८१ बाय ८१ फुटाच्या भव्य कृष्ण मंदिराची निर्मिती केली. या सर्व कामासाठी ७५ टन स्टील, ४ हजार गोणी सिमेंट लागले आहे जागा मंदिर व राहण्याची व्यवस्था यासाठी आतापर्यंत चार कोटी रुपये खर्च झाला आहे.