तथाकथित आयटी पार्कची किरण काळेंनी केली पोलखोल ;
किती कंपन्या आणल्या? किती युवकांना रोजगार दिला ? सत्ताधाऱ्यांना काळेंचा सवाल
प्रतिनिधी : विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शहरात आयटी पार्क उभारण्यात आला होता. या आयटी पार्कची दुसऱ्यांदा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सोशल मीडियाद्वारे लाईव्ह पोलखोल केली आहे. यावेळी त्यांनी ईन कॅमेरा भांडाफोड करताना दाखवले आहे की, तथाकथित आयटी पार्कची बहुतांशी बिल्डिंग रिकामीच आहे. गुटखा, माव्याच्या पुड्यांचा खच बिल्डींगमध्ये आढळून आला. आयटी पार्कच्या उद्घाटनाचा फलक देखील धुळ खात पडल्याचे आढळून आले. ज्यांना लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एमआयडीसीत किती कंपन्या आणल्या ?किती युवकांना रोजगार दिला ? एमआयडीसी विस्तारीकरणासाठी काय केले ? उद्योजकांचे कोणते प्रश्न सोडवले ?, असे अनेक जाहीर संतप्त सवाल यावेळी काळे यांनी केले आहेत.
“विश्वास जुना, आम्हीच पुन्हा” अशी शहरभर पोस्टरबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामांची काँग्रेसच्या वतीने सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी जयंती निमित्त किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलखोल केली जात आहे. त्या अंतर्गत काँग्रेसने एमआयडीसीकडे मोर्चा वळवत ही पोलखोल केली आहे. यावेळी माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते. “विश्वास जुना, आम्हीच पुन्हा.. आयटी पार्कच्या नावाने तरुणांना लावला चुना” असे फलक यावेळी झळकवण्यात आले.
काळे यांनी या व्हिडिओत लाईव्ह दाखवलेले आहे की, आयटी पार्कच्या बिल्डिंगमध्ये ट्रेडिंग कंपनी, पतसंस्था, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जीएसटी कन्सल्टंट अशा काही व्यावसायिक आस्थापना आढळून आल्या आहेत. या आस्थापना म्हणजे काही आयटी पार्क नाहीत. या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये एक आयटी कंपनी आली आहे. मात्र ती आणण्यामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच कोणतही योगदान नाही.
काळे म्हणाले, शहराच्या लोकप्रतिनिधी मागील निवडणुकी पूर्वी शहरातील तरुणांना रोजगाराचे दाखवत तीन हजार तरुणांच्या मुलाखती घेऊन नोकऱ्या देणार असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात फार थोड्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांना त्या ठिकाणी सॉफ्टवेअरचे नव्हे तर डाटा एन्ट्रीचे काम दिले गेले. सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगलबच्चांच्या नावाने कंपन्या स्थापन करून त्यांनाच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. निवडणूक संपल्यानंतर लगेचच बगलबच्चांनी आपल्या कंपन्यांचा गाशा गुंडाळला. अनेक मुलांचे वेतन देखील दिले गेले नाही. त्यांची फसवणूक केली गेली, असा गंभीर आरोप किरण काळे यांनी यावेळी केला.
आयटी पार्क मध्ये कॉल सेंटर :
काळे यांची पाहणी सुरू असताना कोणी तरी पोलिसांना फोन करून पाचारण केले. त्यावेळी एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी एका कंपनीच्या महिला चालकाने या ठिकाणी आयटी कंपनी सुरू असल्याचा दावा केला. काळे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली असता सदर महिला प्रतिनिधीने या कंपनीत कामाला असणाऱ्या शंभर लोकांपैकी ठिकाणी नव्वद टक्के बीपीओ आणि दहा टक्के आयटीचे असल्याचे सांगितले. त्यावर काळे यांनी म्हटले की स्वतः यांनीच कबूल केली की इथे नव्वद टक्के लोक बीपीओत काम करतात. बीपीओ म्हणजे आयटी नाही. बीपीओ हे कॉल सेंटर आहे. यावेळी एका पुरुष प्रतिनिधींना आपल्या या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत काय ? असे काळे यांनी विचारले असता त्याने एकही सॉफ्टवेअर इंजिनिअर नसल्याची कबुली दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काळे यांनी सांगितले की या बिल्डिंगमध्ये असणारे लोकच सांगतात की या ठिकाणी आयटी पार्क चालत नाही. त्यामुळे तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटांनी शहरातल्या हजारो तरुणांची, त्यांच्या पालकांची, नागरिकांची व मतदारांची आपण आयटी पार्क सुरू करून शहरात हजारोंचा रोजगार दिल्याचा कांगावा करुन फसवणूक केल्याचा गंभीर जाहीर आरोप केला आहे.
काळेंचे जगताप यांना लाईव्ह चर्चेचे आव्हान :
किरण काळे यांनी तथाकथित आयटी पार्क बाबत गंभीर आरोप करत या आयटी पार्कचे शिल्पकार आ.संग्राम जगताप यांना लाईव्ह चर्चेसाठी येण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, येताना अभ्यास करून यावे. अभ्यास न करता कृपया येऊ नये. यापूर्वी देखील मी आमदारांना याविषयी जाहीर चर्चा करण्यासाठी येण्याचे आव्हान दिले होते. मात्र ते भित्रे, भेकड आहेत. त्यांनी तरुणांना रोजगार देतो म्हणून त्यांच्या भावनांची चेष्टा केली आहे. म्हणूनच ते लाईव्ह चर्चेला येत नाहीत. ते पळपुटे आहेत, असा आरोप केला आहे. दरम्यान, काळे यांचे आव्हान स्वीकारत जगताप चर्चेला येणार का याबाबत आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.
किरण काळेंवरील विनयभंगाचा तो गुन्हा खोटा :
पाहणी वेळी एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांच्याशी काळे व्हिडिओमध्ये बोलताना दिसत असून काळे यांनी यावेळी माहिती दिली आहे की, दोन वर्षांपूर्वी याच आयटी पार्कचा जेव्हा त्यांनी भांडाफोड केला तेव्हा आमदारांच्या बगलबच्चांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बसून काळे यांच्याविरुद्ध पाहणी करते वेळी काळे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात पुढे सखोल पोलीस तपास झाला आणि न्यायालयामध्ये पोलिसांनी “ब” समरी दाखल करत विनयभंग होण्यासाठी सदर महिला त्यावेळी आयटी पार्कच्या बिल्डिंगमध्ये उपस्थितच नव्हती. तर तिचा विनयभंगा होईल कसा, असे म्हणत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल सदर महिलेवर खटला दाखल करण्याची परवानगी न्यायालयामध्ये चार्ट शीट दाखल करत मागितल्याचे काळे यांनी सांगितले आहे. विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र विद्यमान आमदारां यांनीच रचल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
आयटी पार्क एसईझेडची काळेंची मागणी :
नगर शहरातील युवकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्र्यांकडे किरण काळे यांनी यापूर्वीच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा स्पेशल इकॉनोमिक झोन (एसईझेड) मंजूर करण्याची मागणी निवेदन पाठवून केली आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या कार्यालयासमोर देखील काँग्रेसने काही महिने पूर्वी आयटी पार्क उभारणी करता आंदोलन केले होते. काळे म्हणाले की, शहरात काँग्रेसची सत्ता येऊ द्या. आम्ही शहरातील तरूणांना रोजगार देण्याचे काम करू. उद्योजकांचे प्रश्न सोडवू.