निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत : सुषमा अंधारे

निवडणूक लढण्यापेक्षा प्रचारसभा ताकदीने केल्या पाहिजेत,अशी माझी इच्छा असल्याचे सांगून विधानसभा निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नसल्याचे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.सुषमा अंधारे शुक्रवारी विदर्भाच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’वर बोलताना अंधारे म्हणाल्या, “आम्ही काँग्रेसला रामटेक लोकसभेची जागा सोडली. तेथे खासदार आमच्या पक्षाचे होते. पण मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली. आम्ही प्रचारसुद्धा केला होता. काँग्रेस उमेदवारांसाठी सांगलीतला अनुभव वेदनादायी असून तो विसरणे कठीण आहे. म्हणून सांगलीबद्दल विचार करावा लागतो. कामठी, रामटेकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ती आहे, क्षमता आहे. त्याच जागा आम्ही मागतोय. दर्यापूर, बडनेरा, वाशीम या ठिकाणी जिंकणारे आमचे आमदार होते. आता सर्वेक्षण करा. आम्ही दोन पावले मागे सरकतो, त्यांनीही सरकावे.”महाविकास आघाडीतील तिढ्यावर अंधारे म्हणाल्या, की मेहनत केली आहे ती जागा मिळाली पाहिजे, असे कोणालाही वाटेल. आमच्या पक्षाचे पदाधिकारी अहवाल पाठवतात. नेते अनिल देसाई भूमिका मांडतात. संजय राऊत हे पक्षाच्या हिताचे निर्णय घेतात. त्यानुसार ते भूमिका मांडत आहेत.