राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नवीन पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांनी द्यावयाचा विकल्प तूर्तास कोणीही देऊ नये, सभेत ठराव
नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.7 डिसेंबर) संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृती वेतन योजनेच्या यशस्वीतेबाबत व शासनाकडून संघटनेस मिळालेल्या मान्यतेबाबत संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी मार्गदर्शन केले.
या विषयाबाबत कर्मचारी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. नवीन पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांनी द्यावयाचा विकल्प, तूर्तास 20 मार्च 2025 पर्यंत कोणीही देऊ नये, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. याबाबत राज्य संघटनेशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सभेमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी कर्मचाऱ्यांची जी 10 टक्के रक्कम कपात केली जाते, ती परत मिळण्याकरिता येथून पुढे आंदोलन करून सदरची मागणी पदरात पाडून घेतली जाणार असल्याचे सभासदांना आश्वासित केले. त्यानंतर इतर विषयावर साधक बांधक चर्चा करण्यात करुन सभा शांततेत पार पडली.