अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शहरात वंचितच्या वतीने जोडो मारो आंदोलन
राज्यसभेत बाबासाहेबांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजपच्या विचारसरणीप्रमाणे शाह यांचे वक्तव्य -योगेश साठे
नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शाह व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, सल्लागार जे.डी. शिरसाठ, शहर महासचिव अमर निरभवणे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, संजय शिंदे, जीवन कांबळे, प्रमोद सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.
योगेश साठे म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन नसून, प्रत्येक भारतीयांची अस्मिता आहे. भाजपच्या विचारसरणीप्रमाणे शाह यांनी वक्तव्य केलेले आहे. त्यांना संविधान मान्य नसून, संविधानविरोधी कृत्य केंद्रात व राज्यात केले जात आहे. परभणी येथील घटना देखील याच विचारसरणीतून घडली आहे. बाबासाहेब हे सर्व बहुजनांचे दैवत असून, शाह यांनी केलेले वक्तव्याचा निषेध असल्याचे त्यांनी सांगितले.