शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; तपासासाठी मुलीच्या कुटुंबीयासह उपोषणाचा इशारा

योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर तपास अधिकारी मुलीचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचा तपास न लागल्यास सोमवार (दि.23 डिसेंबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, देवेंद्र वाघमारे, अल्पसंख्यांक विभागाचे गुलाम शेख, ओबीसी सेलचे विजय शिरसाठ, हेमंत उजागरे, अनुप उजागरे आदींसह मुलींचे कुटुंबीय उपस्थित होते.
23 नोव्हेंबर रोजी कोतवाली हद्दीतून मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी बेपत्ता होऊन 20 ते 25 दिवस उलटून गेले आहे, तरी याबाबत ठोस तपास अद्यापही लागलेला नाही. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक या करत असून, त्यांच्याकडे सदर मुलीचे पालक तपासाबाबत विचारण्यात गेले असता, त्यांना तपास अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देतात. सदर प्रकरण ते गांभीर्याने घेत नसून, मुलीबाबत संशयित व्यक्तीची माहिती देऊन देखील त्याच्याकडून योग्य प्रकारे विचारपूस व चौकशी केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलगी ही फक्त मागासवर्गीय समाजाची असल्याने योग्य दिशेने तपास होत नाही. जाणून-बुजून सदर विषयाकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर अल्पवयीन मुली बरोबर कोणताही अनुचित घटना घडू नये, अशी भीती पालकांना सातत्याने वाटत आहे. मुलीबरोबर काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण राहणार? असल्याचा प्रश्‍न उपस्थित करुन तातडीने मुलीचा शोध घेण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.